लोटे : जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ लोटे संचलित ‘नूतन प्राथमिक विद्यामंदिर व नूतन शिशुविहार, लोटे’ या प्रशालेच्या नूतनीकरण व नूतन इमारत बांधकामाचे उद्घाटन नुकतेच अत्यंत उत्साहात संपन्न झाले. दीपक नोव्होकेम टेक्नो. लिमिटेड कंपनी लोटे यांच्या सीएसआर (CSR) फंडातून १४ लाख रुपये खर्चून ही भव्य स्वतंत्र प्राथमिक विभागाची इमारत उभारण्यात आली आहे.
​कंपनीच्या एच.आर. हेड मा. सौ. बर्नाली सेनगुप्ता मॅडम यांच्या शुभहस्ते या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांतजी चाळके हे होते.
​
या संस्थेच्या प्राथमिक विभागासाठी इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना माध्यमिक विभागाच्या वर्गखोल्या वापरव्या लागत होत्या. ही अडचण संस्थाध्यक्ष श्री. चंद्रकांतजी चाळके व संचालक मंडळाने दीपक नोव्होकेम कंपनीच्या एच.आर. हेड सौ. बर्नाली सेनगुप्ता यांच्या निदर्शनास आणून दिली होती. कंपनीने तात्काळ दखल घेत १४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे शाळेची १२ वर्गखोल्यांची मोठी समस्या दूर झाली आहे.
​’दीपकन्या शिष्यवृत्ती’ आणि कौतुकास्पद घोषणा:
दीपक नोव्होकेम कंपनीच्या सहकार्याने प्रतिवर्षी सर्व विद्यार्थिनींमधून प्रथम येणाऱ्या मुलींसाठी “दीपकन्या शिष्यवृत्ती” दिली जाते. यामुळे अनेक आर्थिक दृष्ट्या दुर्बल पालकांच्या हुशार आणि होतकरू मुलींना मोठी आर्थिक मदत मिळते. याच वर्षी मार्च २०२६ च्या दहावीच्या परीक्षेत ९५.६०% गुण मिळवून प्रथम आलेली कु. तीर्था स्वप्निल बोरसुतकर हिची सलग ६ वर्षे ‘दीपकन्या पुरस्कारासाठी’ निवड झाली आहे. तिची हुशारी व अभ्यास पाहून सौ. बर्नाली सेनगुप्ता मॅडम यांनी या विद्यार्थिनीच्या पदवीपर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च कंपनीमार्फत केला जाईल, अशी घोषणा करून सामाजिक उत्तरदायित्वाचा नवा आदर्श घालून दिला. यावेळी बोलताना कारखान्याचे एच आर व्यवस्थापक श्री अमोल अकुलकर म्हणाले, ” जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाने आम्हाला शिशुविहार आणि प्राथमिक विभाग यासाठी इमारत बांधण्याची संधी दिली याचा आम्हाला आनंद आहे. कारण या इमारतीत या पंचक्रोशीतील छोटे विद्यार्थी शिकून पुढे त्यांचे भवितव्य घडवणार आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी एक एखाद्या कारखान्याचा मालक असेल किंवा सामाजिक उत्तरदायित्व विभागाचा प्रमुख असेल आणि त्याच्या हातून सुद्धा असेच एखादे सामाजिक कार्य घडेल.”
या उद्घाटन सोहळ्यास कंपनीचे एच.आर. मॅनेजर मा. श्री. अमोल अकुलकर सर, प्रशांत मानकर सर, प्रोजेक्ट एक्झिक्यूटिव्ह श्री. साहिल शिर्के सर, संस्थेचे माजी अध्यक्ष अंकुशजी काते, राजूभाई रेडीज, उपाध्यक्ष श्री. सुरेश कांबळे, सेक्रेटरी मोहन वारणकर सर, तसेच संचालक श्री. दत्ताराम सावंत, अरुण ठसाळे, नामदेव घाग, अनंत घाग, श्री. सचिन गवळी, सुभाष कडू आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
​संस्था आणि शाळेच्या वतीने सर्व पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रेरणा चव्हाण मॅडम व सौ. स्वरा महाडिक मॅडम यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. नूतन शिशुविहार आणि कविता व्ही. सराफ हायस्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.