मुंबई : पत्राचाळ प्रकरणात अटक झाली होती तेव्हा ‘मी काय विजय मल्ल्या आहे का?’ असे म्हणत सरकारवर टीका करणारे जनाब संजय राऊत आज प्रकाशित होत असलेल्या त्यांच्या पुस्तकात विजय मल्ल्या यांना महात्मा ठरवण्याच्या भूमिकेत आहेत. विजय मल्ल्या यांनी बँकांना तर संजय राऊत यांनी आणि पत्राचाळीतील मराठी लोकांना बुडवले. संजय राऊत यांनी विजय मल्ल्यांची सुपारी घेऊन त्यांना महात्मा ठरवण्याचा प्रयत्न करू नये. कालपर्यंत ते शरद पवार साहेबांची वकिली करत होते, त्यानंतर राहुल गांधींची आणि आता विजय मल्ल्यांची वकिली करणार आहेत. या सगळ्यात ते उबाठा गटाची वकिली करतात की नाही, याचे उत्तर उद्धवजींनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात द्यावे, अशी अपेक्षा भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी व्यक्त केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विजय मल्ल्या यांनी बुडवलेल्या बँकांच्या कर्जापैकी 80 टक्के वसुली करण्याचे काम सरकारच्या वतीने करण्यात आले. परंतु कालपर्यंत जो विजय मल्ल्या तुम्हाला व्हिलन वाटत होता, तो आज कसा काय महात्मा वाटू लागला, याबद्दल एक स्वतंत्र प्रकरण त्यांनी या पुस्तकात जोडावे. ‘बोधकीर्तन’ हे पुस्तक लिहिण्याऐवजी ‘बालबोध नर्तन’ अशा शीर्षकाचे पुस्तक लिहिले असते, तर त्याच्या प्रती जास्त खपल्या असत्या. उद्योगपती देशात अतिशय उत्तम काम करताहेत. सर्वसामान्य बेरोजगार तरुणांना रोजगार देताहेत. कुठेही उद्योजकांना त्रास देण्याचे काम होत नाहीय. उलट, उद्योजकांच्या घराबाहेर बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न करण्याची परंपरा महाविकास आघाडी सरकारच्या काळात होती. त्यामुळे अंबानींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्यासाठी काय काय केले, यावरही संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकात एक प्रकरण त्यांनी लिहावे, अशी सूचना श्री. बन यांनी केली.
श्री. बन पुढे म्हणाले, संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचे अजिबात समर्थन करता येणार नाही. त्यामुळे संजय गायकवाड यांच्याबद्दल संजय राऊत यांची जी भूमिका आहे, तीच माझी भूमिका आहे. परंतु अलिबागमध्ये कोणी कशा जमिनी घेतल्या, याचा इतिहास काढायचा असेल, तर संजय राऊत, तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करून अलिबागमध्ये काय काय केले, याचाही इतिहास काढावा लागेल. उद्धवजी ठाकरे यांचे अलिबागमध्ये 19 बंगले कसे उभे राहिले, याचाही इतिहास काढावा लागेल. आधी आपण अलिबागमध्ये शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली आणि काय केले हे पहा आणि मग इतरांबद्दल बोला.

धंगेकरांनी देवेंद्रजींवर टीका केल्यास त्यांना त्याच भाषेत उत्तर देणार

रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करू नये. ती त्यांची लायकी आणि पात्रताही नाही. देवेंद्रजी फडणवीस कोण आहेत, हे महाराष्ट्राला माहीत आहे. तुम्ही देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करणार असाल तर तुम्हाला त्याच शब्दांत आणि त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल. आम्ही संयम बाळगतो याचा अर्थ असा नाही की आम्ही बोलू शकत नाही. मी तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी धमकी कोणाला देता? महाराष्ट्र काय तुमच्या वडिलांच्या सातबाऱ्यावर आहे का? यापुढे देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर टीका करताना दहावेळा विचार करा, अशा शब्दात श्री. बन यांनी चांगलेच खडसावले.