कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या काळात पश्चिम बंगालचा विकास होऊ शकला नाही. पश्चिम बंगालमधील मागासवर्गीयांना सामाजिक, आर्थिक न्याय मिळालेला नाही. ममतादीदींच्या काळात पश्चिम बंगालमध्ये गुंडाराज वाढले आहे. त्यामुळे या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांची सुट्टी होणार आणि भाजपच्या सत्तेची शिट्टी वाजणार आहे. पश्चिम बंगाल ममतादीदींमुळे झाला आहे कंगाल, अशी घणाघाती टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा असल्याचे ना. रामदास आठवले यांनी आज कोलकाता येथे जाहीर केले.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या सर्व 294 जागांवर रिपब्लिकन पक्षाने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. रिपब्लिकन पक्ष पश्चिम बंगालमध्ये एकही जागा लढवणार नसून सर्व जागांवर भाजपला पाठिंबा राहील. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे गुंडाराज उलथवून टाकण्यासाठी भाजपला पूर्ण ताकदीने पाठिंबा देण्याची गरज असल्याने रिपब्लिकन पक्षाने पश्चिम बंगालमध्ये एकही जागा न लढता सर्व जागांवर भाजपला पाठिंबा दिला आहे. पश्चिम बंगालमधील सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवारांना विजयी करण्यासाठी ताकदीने प्रचार करण्याचे आवाहन ना. रामदास आठवले यांनी कोलकाता येथे केले. कोलकाता येथे भाजप उमेदवारांच्या प्रचार रॅलीत ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी भाजपचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष सामीक भट्टाचार्य उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभर विकासाचे वादळ वाहत आहे. देशभरातील 80 कोटी गरीबांना मोफत अन्नधान्य देण्यापासून अनेक जनहिताच्या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू आहेत. पश्चिम बंगालचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप जनतेची पसंती ठरणार आहे. ममतादीदी आणि तृणमूलच्या गुंडाराजामुळे येथील जनता त्रस्त असून मतपेटीतून तृणमूल सरकारला जनता उद्ध्वस्त करणार आहे. भाजपला येथे विक्रमी बहुमत मिळणार असल्याचा दावा ना. रामदास आठवले यांनी केला आहे.