बारामती – माळेगाव साखर कारखाना देशात क्रमांक एकवर नेण्याचे अजितदादांचे स्वप्न होते.अजितदादांचे हे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करून माळेगाव कारखाना देशातील अग्रगण्य कारखान्यांमध्ये नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करुया असे आवाहन माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

दरम्यान यावेळी कारखान्याच्या प्रगतीसाठी सभासदांनी व्यक्त केलेल्या विविध सूचना व मतांची सकारात्मक दखल घेत, कारखान्याचा कारभार अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचा निर्धार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

स्वर्गीय अजितदादांच्या निधनानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची जबाबदारी माझ्यावर आली. हा कारखाना केवळ एक सहकारी संस्था नसून ही एक लोकचळवळ आहे. आदरणीय अजितदादांना अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या कारभाराचा प्रदीर्घ अनुभव होता. त्यांना कोणत्याही कारखान्याचे चेअरमन होण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, माळेगाव कारखाना काहीसा मागे पडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी या कारखान्याची जबाबदारी स्वीकारली होती असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

सभासदांनी मांडलेल्या विविध मुद्द्यांबाबत बोलताना सुनेत्रा पवार यांनी सर्व सभासदांनी व्यक्त केलेल्या मतांची मी सकारात्मक दखल घेतली आहे. यावर्षी आपण गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत उच्चांकी भाव दिला आहे. त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनी नाराज होण्याचे कारण नाही. पुढील वर्षीही शेतकऱ्यांना उच्चांकी भाव देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे स्पष्ट केले.

हे वर्ष दुष्काळाचे आहे, याची जाणीव आपल्या सर्वांना आहे. बारामती तालुक्यातही दुष्काळ जाहीर झाला आहे. अशा संघर्षाच्या काळात आपली एकजूट अत्यंत महत्त्वाची आहे. दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांनी पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. तसेच ऊस वाहतूक संघटनेच्या अडचणींबाबतही योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिले.

ऊस वाहतूक संघटनेच्या योग्य त्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. कारखाना आणि शेतकरी हितासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आपला प्रयत्न राहील असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची चेअरमन म्हणून मी आपल्या पाठीशी कायम राहीन असा शब्द देताना आदरणीय अजितदादांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण त्यांच्या विचारांनी आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून एकजुटीने पुढे जाऊया असे स्पष्ट केले.