पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील रायगड जिल्ह्याच्या शेवटच्या लोहारे (५९) जिल्हा परिषद गटातून विजयी चौकार मारणारे चंद्रकांत कळंबे यांची रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले.

देवळे (५८) जिल्हा परिषद गटातून सलग दोन वेळा निवडून आल्यानंतर चंद्रकांत कळंबे यांना रायगड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासह कृषी सभापतीपदही प्राप्त झाले होते. यावेळी लोहारे (५९) जिल्हा परिषद गटातून सलग दुसऱ्या वेळी चंद्रकांत कळंबे निवडून आले असून, त्यांना पुन्हा रायगड जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाचा मान मिळाला आहे.

पोलादपूर तालुक्यामध्ये चंद्रकांत कळंबे यांच्या अर्थ व शिक्षण सभापतीपदाच्या निवडीबद्दल सर्वत्र जोरदार स्वागत करण्यात आले. राज्याचे रोजगार हमी योजना, खारजमीन विकास आणि फलोत्पादन मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी त्यांचे प्रथम अभिनंदन केले.

पोलादपूर शहरामध्ये नगराध्यक्ष स्नेहल मेहता, भावी नगराध्यक्ष अस्मिता पवार, उपनगराध्यक्ष मनोज प्रजापती तसेच पंचायत समिती सभापती अविनाश शिंदे, उपसभापती अनिता भिलारे, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, नगरसेवक प्रसाद इंगवले, नागेश पवार, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शहरप्रमुख सुरेश पवार तसेच अनेक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन जेसीबीमधून चंद्रकांत कळंबे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

लोहारे, पोलादपूर, कापडे बुद्रुक, पितळवाडीमार्गे नरवीरभूमी उमरठपर्यंत सभापतीपदाच्या शासकीय वाहनातून प्रवास करताना रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत कळंबे यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.