मुंबई : मुंबईत अनेक भागांमध्ये पाऊस पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आवश्यक खबरदारी घेत आहे. मात्र जनाब संजय राऊतांना सांगायचेय की शहरात पाणी साचल्यावर घरात बसणारे आम्ही नाहीत. मुंबईच्या महापौर रितूताई तावडे सकाळपासून मुंबईच्या रस्त्यावर उतरून आढावा घेत आहेत.

महापालिका यंत्रणाही कार्यरत आहे. निश्चितपणे काही भागांमध्ये नालेसफाई व्यवस्थित झाली नसल्याने पाणी साचले आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तुमच्यासारखे फक्त पत्रकार परिषद घ्यायची आणि घरात बसून आरोप करायचे हा आमचा धंदा नाही, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेल्या शोकप्रस्ताव वाचनात प्रिंट मिस्टेक आणि लहान फॉन्टमुळे काही चुका झाल्या. त्यांच्या भावना महत्त्वाच्या होत्या आणि त्या त्यांनी सभागृहापुढे मांडल्या. विधानभवनासमोर दिलगिरी व्यक्त केली. परंतु संजय राऊत, तुम्ही रोज महाराष्ट्राच्या भावना दुखावता त्याचे काय? राऊत म्हणतात, राहुल नार्वेकरांना रोमन लिपी वाचता येत नाही. मराठी भाषेत रोमन लिपी आहे की देवनागरी लिपी हे तुम्हाला कळत नाही. मराठी भाषेचा गौरव कसा करायचा हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे. रोज पत्रकार परिषद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अश्लील भाषा वापरता.

लोकांना शिवीगाळ करता. कमरेखालचे शब्द वापरून खासदारांना शिवीगाळ करता. जनतेचा अपमान करता. एवढेच नाही तर समोर असलेल्या बूमवर थुंकण्याचे पापही तुम्ही केलेले आहे. त्यामुळे मराठी भाषेचे फार ज्ञान असल्याचा आव आणू नका. मराठी भाषेचा वापर करून इतरांचा अपमान करण्याची दुर्बुद्धी तुम्हाला सुचते आणि त्यामुळे संजय राऊत आधी तुम्ही महाराष्ट्राची माफी मागावी, अशा शब्दात श्री. बन यांनी खरडपट्टी काढली.