लांजा : (गोविंद चव्हाण) सरकारच्या नव्या आदेशामुळे शेतकऱ्यांसमोर डिझेल आणि पेट्रोलच्या उपलब्धतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ११ जून रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार पेट्रोल पंपांवर बॅरल, कॅन किंवा बाटल्यांमध्ये पेट्रोल व डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असल्याने ऐन खरीप हंगामात शेतकरी अडचणीत आल्याची भावना लांजातील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

सध्या पावसाळ्याच्या तोंडावर नांगरणी, वखरणी, पेरणीपूर्व मशागत आणि अन्य कृषी कामांना वेग आला आहे. अशा परिस्थितीत यंत्रसामग्री बहुतांश वेळा शेतातच कार्यरत असते. ही यंत्रे केवळ पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी पंपावर नेणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे शेतकरी बॅरल किंवा कॅनमधून पेट्रोल व डिझेल नेऊन यंत्रांमध्ये भरत असतात. मात्र, नव्या निर्बंधांमुळे अनेक पेट्रोल पंपांनी अशा पद्धतीने पेट्रोल व डिझेल देणे बंद केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

तसेच ट्रॅक्टर, ग्रास कटर, फवारणी पंप, छोटी नांगरणी यंत्रे व रोटरी टिलर आदी कृषी यंत्रे पेट्रोल पंपावर नेण्यासाठी अतिरिक्त वेळ, इंधन आणि खर्च करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात प्रत्येक दिवस महत्त्वाचा मानला जातो. मशागतीची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास पेरणी उशिरा होण्याचा आणि त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याचा धोका निर्माण झाला आहे.