पनवेल : खांदेश्वर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पनवेल महानगरपालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी उभारलेले अत्याधुनिक सार्वजनिक शौचालय (स्वच्छता गृह) सध्या कुलूपबंद अवस्थेत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे शौचालय नागरिकांसाठी बंद असतानाही, या ठिकाणी असणारे विजेचे दिवे मात्र भरदिवसा चालू असल्याचे समोर आले आहे.
पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून, दुसरीकडे विजेचा नाहक अपव्यय होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांची गैरसोय आणि पालिकेची अनास्था खांदेश्वर स्थानक परिसरातून दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. पादचारी आणि वाहनचालकांची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने उड्डाणपुलाखाली अतिशय देखणे आणि रंगीबेरंगी चित्रकाम केलेले हे सार्वजनिक शौचालय उभारले आहे. मात्र, या स्वच्छता गृहाचे पिवळे शटर पूर्णपणे डाऊन करून ठेवण्यात आले आहे.
भरपूर खर्च करून उभारलेली ही सुविधा नेमकी कोणत्या कारणामुळे बंद ठेवण्यात आली आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पनवेल महानगरपालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन हे बंद असलेले स्वच्छता शटर तात्काळ सुरू करणार का, की केवळ विजेची बिलं भरण्यातच धन्यता मानणार, याकडे आता सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
