चिपळूण : चिपळूण शहरातील बाजारपेठ-नाईक पुलाच्या दोन्ही जोडरस्त्यांची उंची तातडीने उंच करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक विक्रांत उर्फ विकी लवेकर यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या कामासाठी तांत्रिक आराखडा तयार करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गोवळकोट रोड, गोवळकोट, पेठमाप आणि बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून हजारो नागरिक, व्यापारी तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी या मार्गाचा दररोज वापर करतात. मात्र पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि त्याचवेळी भरती आल्यास नदीपात्रातील पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे बाजारपेठेतून गोवळकोट रोड व पेठमापकडे जाणारा मुख्य मार्ग पूर्णपणे बंद होतो. परिणामी नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

या परिस्थितीत अनेकांना एन्रॉन पूल किंवा वालोपे मार्गे मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो. स्वतःचे वाहन नसलेल्या नागरिकांची मात्र मोठी गैरसोय होत असल्याचेही लवेकर यांनी नमूद केले आहे.

नाईक कंपनी परिसरातील जुनी कोकण मर्कन्टाईल बँकेच्या बाजूचा रस्ता उंच करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध असल्याचे तसेच पेठमाप आणि गोवळकोट रोडच्या बाजूलाही भौगोलिकदृष्ट्या रस्त्याची उंची वाढविणे शक्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे. योग्य तांत्रिक अभ्यास करून दोन्ही जोडरस्त्यांची उंची उंच केल्यास पावसाळ्यातही हजारो नागरिकांची वाहतूक सुरळीत राहू शकते, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

या कामाचा प्रस्ताव तातडीने तयार करून योग्य डिझाइननुसार निधी मंजूर करण्यात यावा आणि गोवळकोट रोड, पेठमाप व बाजारपेठ परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा, अशी मागणी नगरसेवक विक्रांत (विकी) लवेकर यांनी केली आहे.

या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदाभाई चव्हाण, चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी, बांधकाम सभापती कपिल शिर्के तसेच शिवसेनेचे गटनेते अंकुश आवले यांनाही देण्यात आल्या आहेत.