जळगाव :- काय ओ भाऊ राया, आता तुम्हाला लाडक्या बहिणींचा खर्च दिसतोय ? आता तुम्हाला लाडक्या बहिणी ‘जड’ झाल्यात का ? वहिंनींचे सगळे हट्ट, सगळे लाड पुरवता, मग तुम्हाला लाडक्या बहिणीच नको झाल्यात का ? असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारला आहे.

काही महिन्यांपूर्वी ८० लाख पेक्षा अधिक महिला लाडकी बहिण योजनेतून बाद करण्यात आल्या होत्या. आता महिन्याभराने आणखी १२ लाख लाडक्या बहिणींना बाद करण्यात आले आहे. असं करून सरकारने तब्बल ९२ लाख महिलांना अपात्र केलं आहे. सरकारमधील लोक सांगतात की लाडक्या बहिणींचा खर्च २६ हजार १९७.७८ कोटींवरून ३३ हजार ६९७ कोटींवर गेला आहे. लाडक्या बहिणींवर ७५०० कोटींचा खर्च वाढला आहे असंही त्या म्हणाल्या.

लाडक्या बहिणींचा खंबीर ‘दादा’ आता नाही पण किमान सुनेत्रा वहिनी तुम्ही तरी लाडक्या बहिणींवर होणारा अन्याय मांडा अशा कैफियत त्यांनी शेवटी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मांडली आहे.