पुणे- महाराष्टाचं अध्यात्मिक वैभव असलेला आषाढी वारी दिंडी सोहळा सध्या सुरु आहे. या वारी सोहळ्यातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीमध्ये भीषण अपघात घडला आहे. एका भरधाव ट्रकने चिरडल्याने तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. जेजुरीजवळील भोंगळे मळा येथे ही दुर्घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन विचारपूस केली.

समोर आलेल्या माहितीनुसार, सासवड येथील मुक्कामानंतर आज माऊलींची पालखी जेजुरीकडे प्रस्थान करत आहे. या वारीत आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली आहे. पुरंदर तालुक्यातील जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत सहा वारकरी गंभीर जखमी झाले, ज्यामधील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इतर जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माऊलींची पालखी आज सासवड मधून जेजुरीच्या दिशेने प्रस्थान ठेवते जेजुरीत दाखल झाल्यावर ती पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली जाते, अशातच हा वारीमधीलच ट्रक वारकऱ्यांच्या गर्दीत घुसला आणि यामध्ये जवळपास सहा वारकरी गंभीर जखमी झाले, ज्यामधील तिघांचा अंत झाला. मृतांमध्ये तीन महिला असल्याचे सांगण्यात येत आहे.

आज सकाळी ज्ञानोबा माऊलींची पालखी सासवडहून जेजुरीला जाणार आहे. या पालखीच्या आधी काही वारकरी पुढच्या मुक्कामाच्या दिशेने निघतात. आज सकाळी हे वारकरी रस्त्यावरुन चालत असताना सामान वाहून नेणार एक ट्रक वारकऱ्यांच्या गर्दी शिरला. या ट्रकने पाठून सहा वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. हे सर्व वारकरी आनंदाच विठुनामाचा गजर करत चालत होते. मात्र, या अपघातानंतर घटनास्थळी किंकाळ्या आणि रडण्याचे सूर ऐकायला येत होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. वारकऱ्यांना धडक देणारा ट्रक अचानक अनियंत्रित कसा झाला, प्रशासनाने यासाठी काळजी घेतली नव्हती का, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही.