खोपोली (दत्तात्रय शेडगे) : लोणावळा शहरातील एलआयसी बिल्डिंग शेजारी असलेल्या एका पेट्रोल पंपावर केवळ ‘एक रुपया’ परत देण्याच्या क्षुल्लक कारणावरून ग्राहकांनी मोठा राडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतप्त जमावाने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. तसेच पेट्रोल पंपाच्या ऑफिसच्या काचा फोडून मोठे नुकसान केले. गुरुवारी (२६ मार्च) दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला.

याप्रकरणी पेट्रोल पंप कर्मचारी नरेश बाळू गायकवाड (वय ३३, रा. कार्ला, ता. मावळ) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुंगार्ली येथील देवेंद्र ऑटोलाइन भारत पेट्रोल पंप येथे नरेश गायकवाड व त्यांचे सहकारी उमेश महाप्रसाद मिश्रा (वय ४३) हे ड्युटीवर होते. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास काही ग्राहक तेथे आले. यावेळी केवळ एक रुपया परत देण्याच्या कारणावरून ग्राहकांचा कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला.

या वादानंतर साधारण अर्ध्या तासाने आरोपींनी बेकायदेशीररित्या जमाव जमवून पेट्रोल पंपावर पुन्हा प्रवेश केला. त्यांनी गायकवाड व मिश्रा यांना शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तसेच सोबत आणलेल्या लोखंडी रॉडने मारहाण करून या दोघांना जखमी केले. या संतप्त जमावाने एवढ्यावरच न थांबता पेट्रोल पंपाच्या ऑफिसच्या काचांची तोडफोड करून मालमत्तेचे नुकसान केले.

याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी पेण कोळीवाडा (जि. रायगड) येथील १) अनंत विठ्ठल कोळी (वय ३५), २) प्रसाद संभाजी कोळी (वय ४०), ३) हर्ष रवींद्र मेहेर (वय १४), ४) राज मच्छिंद्र कोळी (वय १७), ५) मच्छिंद्र विठ्ठल कोळी (वय ४५), ६) वेदिका वसंत कोळी (वय २३), ७) विनंती प्रवीण मोकल (सर्व रा. पेण कोळीवाडा, ता. पेण, जि. रायगड) तसेच इतर ४ ते ५ अज्ञात व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ११८(१) व ३२४(४) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खोपडे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. क्षुल्लक कारणावरून झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.