लांजा : तालुक्यातील हर्चे येथील शाखा डाक घरात तब्बल ८ लाख २० हजार १५२ रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी शाखा डाकपाल जयप्रकाश यशवंत पवार यांच्याविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी समीर सूर्यकांत बेल्हेकर (वय ३६, डाकघर निरीक्षक, लांजा उपविभाग, रा.वैभव वसाहत, लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार हर्चे शाखा डाक घरात कार्यरत असताना शाखा डाकपाल जयप्रकाश यशवंत पवार (वय ५१, रा.हर्चे, बौद्धवाडी, ता.लांजा) याने ग्राहकांकडून पोस्ट खात्यासाठी स्वीकारलेली रक्कम अधिकृत सरकारी दस्तऐवजांमध्ये नोंदवली नसल्याचे निष्पन्न झाले.

ही घटना २९ जुलै २०१३ ते २७ नोव्हेंबर २०२४ या सुमारे अकरा वर्षांच्या कालावधीत हा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून जयप्रकाश पवार यांनी संबंधित रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून ५ लाख ३० हजार १५२ रुपये कायमस्वरूपी, तर २ लाख ९० हजार रुपये तात्पुरत्या स्वरूपात अपहार केल्याचे समोर आले असून एकूण ८ लाख २० हजार १५२ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार उघड झाला आहे. याप्रकरणी १३ जुलै रोजी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले करीत आहेत.