चिपळूण : येथील नगर परिषदेच्या नगरसेविका नीलम सीताराम जाधव यांची नगर परिषदेच्या मागासवर्गीय सभापती पदावर बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगर परिषदेच्या 23 जुलै रोजी होणाऱ्या कौन्सिलच्या सभेत त्यांच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.
चिपळूण नगर परिषदेत मागासवर्गीय प्रवर्गातून निवडून आलेल्या त्या एकमेव नगरसेविका असल्याने या पदासाठी अन्य कोणताही दावेदार नसल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नीलम जाधव या शिवसेना शिंदे गटातून प्रभाग क्रमांक 11 मधून मागासवर्गीय आरक्षित जागेवर निवडून आल्या असून, नगरसेविका म्हणून त्या विविध स्थानिक प्रश्नांवर कार्यरत आहेत. आता त्यांच्यावर मागासवर्गीय सभापतीपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याने नगर परिषदेच्या कामकाजात त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. 23 जुलै रोजीच्या कौन्सिल बैठकीत मागासवर्गीय कल्याण विशेष समिती गठीत करण्यात येणार आहे. त्यावेळी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होताच त्या मागासवर्गीय सभापती म्हणून कार्यभार स्वीकारतील.