सावर्डे : शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालय, सावर्डे येथे वाणिज्य विभागाच्या वतीने जागतिक कॉमर्स डे विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त विद्यार्थ्यांनी आधुनिक व्यापार, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांवर आधारित एकूण १३ ई-कॉमर्स मॉडेल्स सादर केली.
या प्रदर्शनामध्ये ई-कॉमर्स, नेटवर्किंग, डिजिटल पेमेंट प्रणाली, बिझनेस मॉडेल्स, ए.आय. रिटेल स्टोअर, ई-मॉल आदी विषयांवरील मॉडेल्सचा समावेश होता. बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी, आधुनिक व्यावसायिक संकल्पना सहज समजाव्यात आणि डिजिटल व्यवहारांविषयी जनजागृती व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार शेखरजी निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बदलत्या जागतिक धोरणांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच कौशल्याधारित शिक्षण, डिजिटल ज्ञान आणि रोजगारनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा सातत्याने विकास करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास प्राचार्य तानाजी कांबळे प्रास्ताविक प्रा. शेबेकर मॅडम यांनी केले. उपस्थितांचे स्वागत विद्यार्थिनी पूजा आवळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सुनील जावीर यांनी मानले.
या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण मॉडेल्सचे उपस्थितांनी कौतुक करत त्यांच्या कल्पकतेचे आणि आधुनिक व्यावसायिक दृष्टीकोनाचे अभिनंदन केले.