चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालय, सावर्डे येथे मराठी विभागाच्या वतीने पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक श्री. संजय पोकळे लिखित “मासा आणि मगर व इतर गोष्टी” या बालकथासंग्रहाचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी प्राचार्यांनी बालसाहित्याचे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत असलेले महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी साने गुरुजी यांच्या “श्यामची आई” या कालजयी साहित्यकृतीतील श्यामच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाचा थोडक्यात आढावा घेत, बालपणी योग्य संस्कार, वाचनाची आवड आणि मूल्यशिक्षण यांचे महत्त्व अधोरेखित केले. बालसाहित्य मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देत त्यांच्यामध्ये संवेदनशीलता, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जाणीव विकसित करण्यास उपयुक्त ठरते, असे त्यांनी सांगितले.
लेखक श्री. संजय पोकळे यांनी आपल्या मनोगतात बालसाहित्य लेखनामागील प्रेरणा, आजच्या पिढीला दर्जेदार वाचनाची गरज आणि पुस्तक संस्कृती जपण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता नियमित पुस्तक वाचनाची सवय लावावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास प्रा. देशील चौरे, प्रा. संकेत करणे, प्रा. दीप्ती शेंबेकर, लेखक श्री. संजय पोकळे, श्री. मनोज खापरे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीला चालना मिळाली असून पुस्तक प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.