चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत चिपळूण येथील सैनिक व माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता मुंबईतील मंत्री शंभूराजे देसाई यांच्या मेघदूत बंगल्यावर ही बैठक होणार आहे.
चिपळूण येथे सैनिक विश्रामगृह उभारणे, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सैनिक व माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी वसतिगृह निर्माण करणे, या दोन प्रमुख विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम यांच्या उपस्तितीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
आमदार शेखर निकम यांनी सैनिक व माजी सैनिकांच्या सुविधांसाठी यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यातून शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. चिपळूणसारख्या माजी सैनिकांची मोठी संख्या असलेल्या भागात स्वतंत्र सैनिक विश्रामगृहाची आवश्यकता असून, शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या सैनिक व माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी वसतिगृहाची सुविधाही उपलब्ध व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
या मागणीच्या अनुषंगाने आता मंत्रालयात बैठक होत असल्याने चिपळूणच्या सैनिक कल्याणाच्या प्रश्नांना शासनस्तरावर चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
बैठकीस सामान्य प्रशासन विभागातील माजी सैनिक कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव, जिल्हाधिकारी रत्नागिरी, माजी सैनिक कल्याण संचालनालयाचे अधिकारी, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाचे अधिकारी तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आदी संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आमदार निकम यांच्या पाठपुराव्यामुळे चिपळूणमधील सैनिक विश्रामगृह आणि पाल्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, बैठकीत शासनाकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सैनिक व माजी सैनिकांचे लक्ष लागले आहे.
आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश; सैनिकांच्या प्रश्नांवर उद्या मंत्रालयात बैठक..
