दापोली : दापोली तालुक्यातील असोंड येथील जनकल्याण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला सर्व संचालक,ठेवीदार कर्जदार,कर्मचारी वर्ग व हितचिंतक यांनी दिलेल्या उदंड प्रतिसाद,प्रतिवर्षी पतसंस्थेला होणारावाढता नफा व वाढणाऱ्या ठेविंचे प्रमाण लक्षात घेऊन आता कोकण विभागीय स्तरासह शाखा विस्तार करण्यावर भर देणार असून संपूर्ण जिल्ह्याबाहेर विविध ठिकाणी, मुंबईसारख्या उपनगरात देखील पतसंस्थेच्या शाखा सुरू करून कोकणवासीयांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत पतसंस्थेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी व्यक्त केले.

नुकतीच पतसंस्थेची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा असोंड येथील प्रधान कार्यालयात उत्साहात पार पडली. यावेळी सभासदांना यंदाही १५ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी स्पष्ट केले.
वार्षिक सभेत मार्गदर्शन करताना त्यांनी पतसंस्थेच्या विविध कामकाजाचा आढावा घेतला. पतसंस्थेने मागील सभेचे इतिवृत्त वाचून त्यास मंजुरी, शासकीय निकषांची पूर्तता, सभासदांच्या ठेवींचे संरक्षण, ताळेबंदास मंजुरी, नफा वाटणीस मंजुरी, व्यवस्थापक समितीच्या ठरावास मंजुरी आदी विषयांवर यावेळी सभासदांसमोर चर्चा करण्यात आली.
पतसंस्थेने दृष्टीकोनातून सर्व निधीची १०० टक्के गुंतवणूक केली असून एसएलआर गुंतवणूकही परिपूर्ण करण्यात आली आहे. सभासदांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे, पुढील वर्षासाठी बाहेरील कर्जाची मर्यादा, लेखापरीक्षण अहवालाची नोंद तसेच अंतर्गत व शासकीय लेखापरीक्षणासाठी परीक्षकाची नियुक्ती यांसारख्या विषयांनाही सभेत मंजुरी देण्यात आली.

पतसंस्थेने थकबाकी वसुलीवर विशेष भर दिला असून एनपीएचे प्रमाण कमी करून थकबाकी पाच टक्क्यांच्या आत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. संस्थेच्या आर्थिक शिस्तीबरोबरच सभासदांच्या ठेवी सुरक्षित राहाव्यात, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे. संस्थेच्या प्रधान कार्यालयासह पाच शाखांचे कामकाज उत्तम प्रकारे सुरू असून, संस्थेने ऑडिटमध्ये ‘अ’ वर्ग कायम ठेवला असल्याची माहिती पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश पाटील यांनी यावेळी दिली.

या सभेला जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोलांबडे,उपाध्यक्ष विस्वास खांबे,पंचायत समिती सदस्य नरेश घरटकर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण शिंदे, प्रशांत कदम, श्रीकांत बुटाला, सदाशिव रसाळ, रवींद्र घडवले, गोविंद पालटे, भरत दाभोळकर, चंद्रकांत परवलकर, चंद्रकांत चोगले, गणेश देवघरकर, प्रकाश मानके, ज्येष्ठ संचालक गजानन पेठे, संचालक विनोद गोंधळेकर, कमलाकर आंग्रे, मारुती चिपळूणकर, रेणुका चोगले, नितीन यादव, डॉ. सुनील गोरीवले, प्रमोद रहाटे आदी उपस्थित होते.
सभेच्या शेवटी संचालक मारुती चिपळूणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.