खेड ( दिवाकर प्रभु ) : – सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खेड येथे उभारण्यात आलेले शासकीय विश्रामगृह सध्या ‘कागदावरच’ असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तब्बल २ कोटी ८० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे काम अद्याप पूर्णत्वास गेले नसून, आवश्यक निधी उपलब्ध न झाल्यामुळे उर्वरित काम रखडले आहे.
सध्या या विश्रामगृहाच्या तळमजल्यावरील चार सूट्सचे काम पूर्ण झाले असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांसाठी सेवा सुरू करण्यात आलेली नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे केअरटेकर, चौकीदार आणि खानसामा या महत्त्वाच्या पदांची रिक्तता होय. कर्मचारी नसल्यामुळे विश्रामगृहाचे व्यवस्थापन करणे शक्य नसून, त्यामुळेच ऑनलाइन बुकिंग सेवा देखील अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी, शासनाने मोठा खर्च करून उभारलेली ही सुविधा वापराविना पडून आहे.