चिपळूण : तालुक्यातील महत्त्वाचा आणि गजबजलेला डेरवण मार्ग सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. जागतिक दर्जाचे वालावलकर रुग्णालय, कोकणातील पहिले विद्यापीठ, मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, इंग्लिश मीडियम शाळा तसेच विविध शैक्षणिक व आरोग्य संस्था या मार्गावर असल्याने येथे दिवसभर विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि अन्य वाहनांची मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. मात्र रस्त्यावरील मोठमोठे खड्डे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

विशेष म्हणजे या खड्ड्यांबाबत वारंवार बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे खड्ड्यांची दुरुस्ती डांबरीकरणाऐवजी जांभ्याची (चिऱ्याची) खडी व माती टाकून केली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसामुळे काही तासांतच ही खडी व माती वाहून जात असून खड्डे पुन्हा पूर्ववत होत आहेत. त्यामुळे दुरुस्तीचा हा प्रकार केवळ तात्पुरती मलमपट्टी असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
रस्त्यावर पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी स्वरांचे अपघात घडत आहेत, येथील प्रवाशांचे जीवितास धोका निर्माण झाला आहे. रुग्णवाहिकांच्या वाहतुकीलाही याचा फटका बसत असून रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही रोज या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असून तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी रस्त्याचे दर्जेदार व कायमस्वरूपी डांबरीकरण करण्याची आणि सदर मार्गावरील धोक्याचे ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा एखादा गंभीर अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.