खेड : पर्यावरण संवर्धनाचा ध्यास, निसर्गाप्रती करुणेची भावना आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्याची जिद्द मनाशी बाळगून भारताच्या किनारपट्टीलगत सुमारे ७ हजार किलोमीटरची पदयात्रा करणारे २४ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ते अयान बॅनर्जी यांनी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकचा कमी वापर, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि प्राणिमात्रांप्रती करुणा याविषयी मार्गदर्शन केले.
पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि व्हेगन आहाराबाबत जनजागृती करणे या उद्देशाने अयान बॅनर्जी यांनी ‘करुणा पदयात्रे’चा संकल्प केला आहे. भारताच्या किनारपट्टीलगत सुरू असलेल्या त्यांच्या या दीर्घ पदयात्रेतून पर्यावरण रक्षण, प्राणीमात्रांप्रती संवेदनशीलता आणि जबाबदार जीवनशैलीचा संदेश समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये त्यांच्या आगमनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले. दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर टाळणे, पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे आणि निसर्गाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची किंवा पर्यावरण कार्यकर्त्यांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचा संदेशही त्यांच्या मार्गदर्शनातून देण्यात आला. या संवादातून विद्यार्थ्यांना पर्यावरणाप्रती संवेदनशीलता जपण्यासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव झाली. स्वतःच्या दैनंदिन सवयींमध्ये छोटे-छोटे बदल करून पर्यावरण रक्षणासाठी योगदान देता येते, हा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. याप्रसंगी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. जोगेश साडविलकर, रोटरी सदस्य श्री. करुणाकरण सर आणि श्री. वैद्य सर उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या वतीने अयान बॅनर्जी यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उच्च माध्यमिक विभागप्रमुख श्री. राहुल गाडबैल यांनी केले. मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, माध्यमिक विभागप्रमुख श्री. शैलेश देवळेकर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी अयान बॅनर्जी यांच्या पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रेरणादायी कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पर्यावरण रक्षणाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारा हा संवाद निसर्गाप्रती संवेदनशीलता, करुणा आणि जबाबदार जीवनशैलीचा संदेश देणारा ठरला.