चिपळूण ( सुनिल साळवी ) : महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात हा चिपळूणमध्ये एका मोठ्या व्यवहारासाठी येऊन गेला असल्याचे अधिकृत वृत्त हाती आले आहे. चिपळूण बरोबरच रत्नागिरी आणि राजापुरातही खरातने याच व्यवहारासाठी चाचपणी केली होती असेही विश्वसनीय सूत्रांनी ठामपणे सांगितले. संपूर्ण देशात खरात प्रकरण सध्या जोरदार गाजते आहे. तोच भोंदू खरात चिपळूणला येऊन गेल्यामुळे त्याचे तळकोकणशी कनेक्शन उघड झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणारा आणि अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले असा आरोप असलेला भोंदू बाबा अशोक खरात सध्या अटकेत आहे. अत्याचार, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रींग असे बारापेक्षा अधिक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे आणि एसआयटीने अधिक सखोल तपास सुरू केल्यामुळे खरातचे एक एक कारनामे उघड होऊ लागले आहेत. त्यातच कोकणातील तसेच ठाणे, मुंबई आणि महाराष्ट्रातील बडे नेते, लोकप्रतिनिधी, मंत्री, खासदार, आमदार यांची खरात सोबतची छायाचित्रेही व्हायरल झाल्यामुळे खरात हा आपल्यासोबत किती जणांना अडकवणार याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. कोकणातील दोन बडे नेते खरातच्या संपर्कात होते असा आरोप होत आहे. त्यामुळे खरातने कोकणात गुंतवणूक असावी अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पनवेल परिसरात त्याच्या जमिनी आहेत अशी माहिती नुकतीच उजेडात आली. त्या व्यतिरिक्त कोकणात त्याची कुठे कुठे गुंतवणूक किंवा मालमत्ता आहे याचा सुगावा लागत नव्हता.
अलिबागमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली?
अलिबागमध्ये अनेक धनदांडग्यानी जमिनी खरेदी करून आलिशान बंगले, फार्म हाऊस आणि रो हाऊस बांधले आहेत. तासाभरात गेटवे ने बोटीतून मांडव्याला जाता येते. त्यामुळे नामवंत कलाकारांनीही अलिबागमध्ये बंगले उभारले आहेत. अशा सर्वांचीच पसंती असलेल्या अलिबागमध्ये खरातने मोठी प्रॉपर्टी खरेदी केली असावी अशी माहिती सूत्रांनी दिली. अर्थात खरातच्या नावाने या मालमत्ता नसून त्याच्या खाजगी सचिवाच्या नावाने जमिनी खरेदीचा व्यवहार झाला असल्याचे वृत्त आहे.
खरातची ही आहे खरी ओळख
भोंदूबाबा अशोक खरात याची खरी ओळख अजूनही जगाला झालेली नाही.तो ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र आधारे लोकांना मार्गदर्शन करतो, त्यांचे भविष्य सांगतो, अडचणींवर काही काही उपाय सांगतो आणि त्याच्याकडील काही तांत्रिक वस्तू हजारो किमतीला विक्री करतो. हे करीत असतानाच महिलांवर त्याने अत्याचार करून फसविले अशी माहिती आजपर्यंत प्रसिद्ध झाली आहे. मात्र दैनिक सागरला या व्यतिरिक्त खरातची खरी ओळख सांगणारी माहिती हाती आली आहे. खरात हा इस्टेट एजंट म्हणून नाशिकमध्ये काम करीत होता. कॅप्टन म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्याने नाशिक मधील अनेकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर जागा खरेदी केल्या. त्याबरोबर अंकशास्त्र आणि ज्योतिष शास्त्राचा आधार घेऊन तो मार्गदर्शन करू लागला. कर्मधर्मसंयोगाने कावळा बसायला आणि फांदी तुटायला या म्हणी प्रमाणे काहींची कामे झाली आणि ‘माऊथ पब्लिसिटी’ मुळे त्याच्या कार्यालयात येणाऱ्यांची गर्दी वाढू लागली. मात्र तोपर्यंत त्याचे प्रस्थ म्हणावे तसे वाढले नव्हते.
बड्या नेत्यामुळे खरात मोठा झाला
अनेक वर्षे खरात नाशिक पुरताच मर्यादित होता. मात्र त्याचा संपर्क राज्यातील एका बड्या नेत्याशी झाला आणि मग खरातकडे भविष्य जाणून घ्यायला येणाऱ्यांची रीघ वाढू लागली. त्यापैकी काहींना तो पांडुरंग वाटू लागला तर काहींनी करंगळी कापून घेतल्या. खरातने एका बैठकीत तर भला मोठा जातीवंत नागही प्रकट केला अशा सुरस कथाही चर्चेत आहे. त्यातून खरात प्रस्थ वाढले आणि त्याची सर्वदूर प्रसिद्धी झाली.
असंख्य महिला का फसल्या..
कौटुंबिक आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी खरातकडे गेलेल्या असंख्य महिला का फसल्या? याचा मानसशास्त्राच्या दृष्टीनेही शोध घेतला जात आहे. यासंदर्भात दैनिक सागरला अधिकृत सूत्रांनी सांगितले की, खरातने “बंगाली विद्या” प्राप्त केली होती. बंगाली विद्येत मलमुत्राचा वापर होतो. शिवाय वशीकरण असो की संगोपन असो बंगाली विद्येच्या आधारे खरातने अनेक महिलांना संमोहित करून त्यांचे शोषण केले. अर्थात या ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा हा उद्देश नसून सूत्रांनी दिलेली माहिती आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. बंगाली विद्येच्या आधारे तो लोकांची फसवणूक करीत होता असेही या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
चिपळूणशी काय आहे कनेक्शन..
अशोक खरात हा मोठ्या प्रमाणावर जागा जमिनीचे व्यवहार करीत होता. अशातच एका व्यवहारासाठी तो नाशिक येथून चिपळूणला आला होता. अर्थात तो कोणत्याही आलिशान गाडीतून आला नाही तर रेल्वेने चिपळूण स्टेशनवर उतरला. सोबत त्याचा पीए देखील होता.ही घटना काही वर्षांपूर्वीची आहे. अशोक खरात चिपळून रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर खाजगी वाहनाने तो व त्याचे साथीदार रत्नागिरीकडे रवाना झाले.
नाणारमध्ये जागा खरेदी करायची होती*
काही वर्षांपूर्वी नाणारचा नियोजित प्रकल्प गाजला. अनेक परप्रांतीयांनी आजूबाजूच्या जागा खरेदी करण्याचा सपाटा लावला . त्यामुळे खरातलाही नाणारमध्ये काही हेक्टर जागा खरेदी करून मोठी गुंतवणूक करायची होती आणि दोन बॅगां भरून त्याने त्यावेळी रोकडही आणली होती. ही बातमी ब्रोकर लोकांना कळली आणि अनेक जणांनी त्याला संपर्क साधायला सुरुवात केली. मात्र एकाही एजंटकडून समाधान होईल अशी खात्रीशीर माहिती त्याला मिळाली नाही. प्रत्येक एजंट निरनिराळी माहिती, जागांचे वेगवेगळे आकडे सांगू लागला.त्यामुळे खरातने इथे व्यवहार न केलेलाच बरा असा विचार केला आणि तो माघारी फिरला आणि पुन्हा फिरकलाच नाही. असे या विश्वासनीय सूत्रांनी दैनिक सागरला सांगितले. हाच खरात आता लैंगिक शोषण आणि फसवणूक अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अटकेत असून राज्यभर त्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे.
