म्हसळा : म्हसळा पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन रायगड लोकसभेचे खासदार श्री. सुनीलजी तटकरे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. खासदार सुनील तटकरे व महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून या अत्याधुनिक इमारतीस प्रशासकीय मान्यता मिळाली असून, सुमारे पावणे पाच कोटी रुपये खर्चाच्या या इमारतीचे बांधकाम वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश तटकरे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
​नागरिकांना पोलीस ठाण्यात येण्याची वेळ कमी यावी
उपस्थितांना संबोधित करताना खासदार सुनील तटकरे म्हणाले, “स्मशानभूमी असो किंवा पोलीस ठाणे, अशा विकास कामांचे भूमिपूजन किंवा लोकार्पण करताना आपण शुभेच्छा तरी काय देणार? इमारत उत्तम व्हावी, पोलीस प्रशासनाचे काम चांगले चालावे; मात्र नागरिकांना पोलीस ठाण्यात येण्याची वेळच कमी यावी हीच अपेक्षा आहे.” छत्रपती शिवाजी महाराज चौकाला लागूनच उभारण्यात येणाऱ्या या नवीन इमारतीमुळे म्हसळा शहराच्या सौंदर्यात व वैभवात भर पडणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच बांधकामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी कंत्राटदाराला सूचना दिल्या.
​विकासकामांचा आढावा व कायदा-सुव्यवस्था
आपल्या सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्यांचा उल्लेख करताना तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात पोलिसांच्या सेवेसाठी ११० वाहने उपलब्ध करून दिल्याचा, तसेच म्हसळा येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय व श्रीवर्धन येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारल्याचा उल्लेख केला. “मी कधीही गुन्हेगारी वृत्तीचे समर्थन केले नाही आणि यापुढेही करणार नाही,” असे सांगत संवेदनशील घटना घडल्यास पोलिसांनी संवेदनशीलतेने व खोलवर जाऊन तपास करावा, असे आवाहन त्यांनी केले. विकासकामांसाठी केंद्रातून निधीची कमतरता पडणार नाही, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

या सोहळ्याला उपअधिक्षक पवार, उपविभागीय अधिकारी योगिता कोठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर, माजी सभापती नाजीम हसवारे, सभापती बबन मनवे, जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे, अनिल बसवत, नगराध्यक्ष सुनील शेडगे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, उपसभापती लहू म्हात्रे, पंचायत समिती सदस्या प्रियंका निंबरे, समृद्धी सासले, महिला अध्यक्षा मीना टिंगरे, गटनेते संजय कर्णिक, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.