खेड (प्रतिनिधी) – शहरातील एसटी स्टँड परिसरात शनिवार दि. २४ मे रोजी पहाटे ५:१० वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी समर्थ स्टॉल या दुकानाला अचानक मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली. आणि या आगीत हे स्टॉल आगीच्या पूर्णपणे भक्ष्यस्थानी सापडून जळून खाक झाले.
पहाटेच्या वेळी लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच खेड नगरपरिषद अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग शेजारील दुकानांमध्ये पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात यश आले. विशेषतः शेजारचे दुकान सुरक्षित वाचवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाल्याने मोठी हानी टळली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे. या कारवाईमध्ये फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव तसेच सहायक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ आणि सुरज शिगवण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
घटनास्थळी मदतीसाठी कुंदनजी सातपुते, आनंद गोविंद खेडेकर तसेच खेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. अग्निशमन विभागाच्या वेगवान प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.