मंडणगड – लोककला, शाहिरी आणि सामाजिक प्रबोधन क्षेत्रात आयुष्यभर कार्यरत राहून कै. शाहीर हरिश्चंद्र लोखंडे उर्फ लोखंडे गुरुजी यांनी रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना शासनाच्या मानधन योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जागृती व प्रसाराचे महत्त्वपूर्ण कार्य केले. वृद्ध कलाकारांना केवळ मानधनच नव्हे, तर त्यांच्या कलेचा आणि योगदानाचा सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी केले. लोककला मराठी शाहीर परिषद, मंडणगड शाखेच्या वतीने कलाभवन येथे 9 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित कै. लोखंडे गुरुजी यांच्या श्रद्धांजली सभेत त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्ह्यातील शाहीर, लोककलावंत, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. केंद्रे म्हणाल्या, की लोखंडे गुरुजी यांचे कार्य केवळ शाहिरी कला सादर करण्यापुरते मर्यादित नव्हते. ग्रामीण भागातील अनेक कलाकारांनी आयुष्यभर लोककलेची सेवा केली; मात्र वयाच्या उत्तरार्धात त्यांच्याकडे आर्थिक आधाराचा अभाव होता. अशा वृद्ध साहित्यिक व कलाकारांपर्यंत शासनाच्या मानधन योजनेची माहिती पोहोचवून त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लोखंडे गुरुजींनी पुढाकार घेतला. कलाकाराच्या कलेचा सन्मान त्याच्या हयातीत झाला पाहिजे, ही लोखंडे गुरुजींची भूमिका होती. वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांना शासनाच्या मानधन योजनेचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात जागृती केली. अनेक कलाकारांना मानधन मिळवून देण्याबरोबरच त्यांना सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे, असे अस्मिता केंद्रे यांनी सांगितले. कोकणातील शाहिर आणि लोककलावंतांना संघटित करण्यासाठी शाहीर परिषदेच्या माध्यमातून केलेले कार्यही महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. कलाकारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मंडणगड येथे कलाभवन उभारण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही केंद्रे म्हणाल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कै. लोखंडे गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कलाप्रवासाच्या आणि सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. लोककलेची परंपरा पुढे नेणे आणि कलावंतांच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहणे, हीच लोखंडे गुरुजींना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी लोककला मराठी शाहीर परिषद मध्यवर्ती कमिटीचे उपाध्यक्ष अनंत केंद्रे, मंडणगड शाखेचे अध्यक्ष तुकाराम रेणोसे, दापोलीचे अध्यक्ष अनिल शेडगे, नगरसेवक विनोद जाधव, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, पांडुरंग बाईत, सुधीर महाडिक, संतोष पार्टे, अशोक वनगुळे, अभय पिचुर्ले, सखाराम माळी, अरुण नाकती, संजय शेडगे, विश्वदास लोखंडे, रवींद्र लोखंडे, सुरेश कदम, प्रभाकर जाधव, नीलेश रक्ते असंख्य शाहीर व लोखंडे कुटुंबीय उपस्थित होते.