माखजन : चिपळूण येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरात ‘मित्र’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या नाट्यप्रयोगाने मंदिरातील रामनवमी उत्सवाची सांगता झाली.
श्री लक्ष्मी नारायण देवस्थान नाट्य समाजाने डॉ. गिरीष आठवले लिखित दोन अंकी नाट्यप्रयोग सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. या नाटकाचे दिग्दर्शन जयंतराव चितळे यांनी केले होते, तर निशिकांत कानिटकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणात अतिशय कमी जागेत नेपथ्य व रंगमंच व्यवस्था प्रभावीपणे करण्यात आली होती. ही व्यवस्था सुहास खरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती.
अनिल सोमण यांनी दादासाहेब पुरोहित यांची भूमिका साकारली. तर सौ. सीमा रानडे यांनी मिसेस रुपवते यांची भूमिका प्रभावीपणे सादर केली. या नाट्यप्रयोगात निरंजन केतकर, मेधा केतकर, डॉ. माधव सोमण, विपुल गोगटे यांनी विविध भूमिका साकारल्या. नाटकाचे रंगभूषा व पार्श्वसंगीत शशी पेंडसे यांनी, तर प्रकाशयोजना उदय पोटे यांनी पाहिली.
दिवसेंदिवस गावागावांतील स्थलांतर आणि वेळेअभावी अनेक नाट्यमंडळांच्या वार्षिकोत्सवांत सादर होणाऱ्या नाट्यप्रयोगांच्या वर्षानुवर्षांच्या परंपरा लोप पावत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत श्री लक्ष्मी नारायण देवस्थान नाट्य समाज, चिपळूण हे आपली नाट्यपरंपरा अखंडित ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न करताना दिसत आहे.
लक्ष्मी नारायण मंदिरात रामजन्मोत्सव मोठ्या थाटामाटात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमांना हजारोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. देवस्थानचे अध्यक्ष ॲड. मकरंद साठे यांनी सर्वांचे आभार मानले.
