चिपळूण : चिपळूण तालुक्यातील कळमुंडी येथील हनुमानवाडी परिसरात विश्वासाला तडा देणारी घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरणीनेच आपल्या साथीदाराच्या मदतीने घरफोडी करून तब्बल ५ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केल्याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घरगुती मदतनीस ठेवताना अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
याबाबत सुयोग संतोष बेलवलकर (वय ३०, व्यवसाय – हॉटेल, रा. कळमुंडी, हनुमानवाडी, ता. चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, ३१ जुलै रोजी सकाळी ५ वाजल्यापासून १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.०४ वाजेपर्यंत त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधण्यात आली. आरोपींनी घराच्या दर्शनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाटातील मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याचे मंगळसूत्र, कानातील दागिने, सोन्याची चेन, ब्रेसलेट, पेंडंट, अंगठ्या, सोन्याची नाणी, नथ, सोन्याचे मणी तसेच १८ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम यांचा समावेश असून, एकूण चोरीचा ऐवज ५ लाख ८८ हजार ६०० रुपये इतका आहे
