महाड : मुंबई-गोवा महामार्गावरील नडगाव गावाच्या हद्दीत दरड कोसळल्याने महाडकडून पोलादपूरकडे जाणारी वाहतूक काही काळ थांबवण्यात आली. दरड कोसळल्याची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
घटनास्थळी एमआयडीसी पोलीस तसेच महामार्गाचे काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीचे कर्मचारी दाखल झाले असून, रस्त्यावर आलेली दरड हटवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी भोपरे गावापासूनच वाहतुकीचे डायव्हर्जन केले आहे. दोन्ही बाजूंची वाहतूक पर्यायी पद्धतीने एकाच मार्गाने वळवण्यात आली असून, दरड पूर्णपणे हटविल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे.