पोलादपूर :- रायगड जिल्हा आणि सातारा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील शिवशौर्याचा वारसा सांगणाऱ्या प्रतापगडावर देवी भवानी आईच्या स्थापनेला ३६७ वर्षपूर्ती झाली आणि गेल्या १६ वर्षांपासून सुरू झालेल्या मशाल महोत्सवाचे यंदाचे १७ वर्ष ३६७ मशालींच्या तेजोमय शिवशौर्याचा जागर करून साजरे झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावरील संकट असलेल्या अफझलखानाचा कोथळा काढून ढोरप्याच्या डोंगराचे बांधकाम करून किल्ल्यात रुपांतर केले आणि या शिवप्रतापाची आठवण प्रतापगड नावाने अजरामर केली. प्रतापगडावर गंडकी नदीतून आणलेल्या पाषाणापासून घडविलेल्या आई भवानी मातेच्या मुर्तीची स्थापना केली. आई भवानी मातेच्या स्थापनेला ३६७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रात्री ३६७ मशाली प्रज्वलित करून १७ वा मशाल महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पेटलेल्या मशालींनी अवघा प्रतापगड आणि परिसर प्रकाशमय झाला.
ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने संपूर्ण गडावर देवी आईच्या पालखीची गड प्रदक्षिणा मिरवणूक यामुळे शिवकाळ अवतरल्याचा अनुभव मशाल महोत्सवानिमित्त आधुनिक काळातील शिवभक्त मावळे आणि भवानीदेवीआईचे हजारो भक्त घेत होते.
आई भवानी मातेच्या स्थापनेला २०१० मध्ये ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ३५० मशालींनी मशाल महोत्सवाची परंपरा सुरु करण्याची संकल्पना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि राजमाता श्रीमंत कल्पना राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवकालीन खेडेगावचे संस्थापक संचालक आप्पासाहेब उतेकर यांच्या पुढाकारातून साकार करण्यात आली. यंदा ३६७ वर्षांचे औचित्य साधत ३६७ मशाली प्रज्वलित करण्यात आल्या.
महोत्सवाच्या निमित्ताने प्रतापगडावरील भवानी माता मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भवानी मातेची विधिवत पूजा-अर्चा झाल्यानंतर रात्री मशाल प्रज्वलनाचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला.
एकामागून एक प्रज्वलित होणाऱ्या ३६७ मशालींनी पूर्वीच्या टेहाळणी बुरूज अथवा झेंड्याचा बुरुज म्हणजेच जीवा महाला बुरूज परिसरात अद्भुत प्रकाशचित्र निर्माण केले. रात्रीच्या गडद अंधारात धगधगत्या मशालीच्या ज्वाळांनी उजळून निघालेले तट-बुरूज आणि प्रकाशगड झालेला प्रतापगड पाहताना उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
स्वराज्य ढोल पथकाच्या ढोल-ताशांच्या निनादाने आसमंत दणाणून गेला तर फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश उजळून निघाले. दरवर्षीप्रमाणे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून शिवभक्त, पर्यटक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.