चिपळूण : साई कॅरम क्लब, चिपळूण यांच्या वतीने आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या कॅरम स्पर्धेचे उद्घाटन युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे आणि उपशहर प्रमुख संजय रेडीज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून उत्साहात करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. क्रीडाप्रेमींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, कॅरम खेळाला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक खेळाडूंच्या कौशल्याला चालना देणे, या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धा सिंगल इव्हेंट स्वरूपात आयोजित करण्यात आली असून, विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी व रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय कॅरममधील विशेष कौशल्याचे दर्शन घडवणाऱ्या ‘ब्रेक टू फिनिश’ आणि ‘ब्लॅक टू फिनिश’ या कामगिरीसाठी स्वतंत्र विशेष रोख पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू देवळेकर यांनी केले. स्पर्धेच्या प्रारंभी साई कॅरम क्लबचे मालक संतोष शिगवण यांचे वडील रामभाऊ शिगवण तसेच कॅरमपटू हेमंत सातोस्कर, सदानंद सुर्वे आणि मंगेश कोकजे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपशहर प्रमुख संजय रेडीज यांनी मनोगत व्यक्त करत स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक केले आणि सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

या उद्घाटनप्रसंगी युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, रत्नागिरी दक्षिण जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, शहर सचिव प्रशांत मुळ्ये, उपशहर प्रमुख संजय रेडीज, युवासेना उपशहर अधिकारी आकाश कदम, युवासेना विभाग प्रमुख राहुल गुरव आणि साहिल मुजावर उपस्थित होते.

तसेच साई कॅरम क्लबचे कॅरमपटू दुर्वांकुर होमकळस, सौरभतांबे, मुन्ना वरवडेकर, बाबाशेठ शिंदे, शेखर खातू, कैलास देवळेकर, संदीप मोरे, राजू जोगळेकर, निनाद कदम, सुनील जाधव, सुधीर जानवलकर, राजू देवळेकर, क्लबचे मालक संतोष शिगवण, धनेश खेडेकर, टायगर सकपाळ, केतन चिखले आणि अबरार यांची उपस्थिती होती.

स्थानिक क्रीडागुणांना प्रोत्साहन देणारा उपक्रम

क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कौशल्यासोबत सराव, एकाग्रता, संयम आणि जिद्द यांची आवश्यकता असते. कॅरमसारख्या बुद्धिकौशल्याच्या खेळातून या गुणांना वाव मिळतो. अशा स्पर्धांच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळते, तसेच क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते. साई कॅरम क्लब आणि युवासेनेच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित ही स्पर्धा चिपळूणमधील कॅरम खेळाडूंना प्रोत्साहन देणारा उपक्रम ठरत आहे.