म्हाप्रळ : मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ आणि परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येकडे सामाजिक कार्यकर्ते बिलाल म्हाळुंकर यांनी महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या समस्येबाबत त्यांनी आक्रमक भूमिका घेत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून, महावितरणच्या सकारात्मक प्रतिसादामुळे म्हाप्रळ परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून म्हाप्रळ परिसरात किंचित पाऊस किंवा हलका वारा सुटला तरी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत होते. काही वेळा सलग तीन दिवस वीजपुरवठा बंद राहत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि आजारी व्यक्तींचे हाल होत होते. त्याचबरोबर विद्यार्थी, ऑनलाइन काम करणारे तरुण आणि स्थानिक व्यावसायिकांनाही याचा फटका बसत होता. रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारात राहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या गंभीर समस्येची दखल घेत बिलाल म्हाळुंकर यांनी २१ ऑक्टोबर २०२६ रोजी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. मुख्य वीजवाहक तारा, जुने विद्युत खांब आणि रोहित्रांची तज्ज्ञ पथकाकडून तपासणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, वारंवार बिघाड होणाऱ्या ठिकाणी इन्सुलेटेड वायर्स किंवा भूमिगत केबलचा पर्याय विचारात घ्यावा, तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास तातडीने दुरुस्ती करण्यासाठी पुरेसे तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशा प्रमुख मागण्या त्यांनी मांडल्या होत्या.
महावितरणच्या सकारात्मक भूमिकेमुळे वीजपुरवठा सुरळीत
म्हाप्रळमधील वीज समस्येबाबत आवाज उठविल्यानंतर महावितरण प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने वीजपुरवठा सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत होणे ही समाधानाची बाब असली, तरी भविष्यात पाऊस किंवा वारा सुरू झाल्यानंतर पुन्हा पुन्हा वीज खंडित होऊ नये, यासाठी महावितरणने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
“म्हाप्रळच्या ग्रामस्थांना वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येतून कायमस्वरूपी मुक्ती मिळावी, हाच आमचा प्रयत्न आहे. महावितरणने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने समाधान वाटते. मात्र, भविष्यात नागरिकांना अशा त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी यंत्रणेची नियमित देखभाल आणि आवश्यक तांत्रिक सुधारणा करणे गरजेचे आहे,” अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते बिलाल म्हाळुंकर यांनी मांडली.