मंडणगड : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांच्या मूल्यमापनात मंडणगड तालुक्यातील तोंडली ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तोंडली ग्रामपंचायत ३० लाख रुपयांच्या पारितोषिकाची मानकरी ठरली आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीने केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, प्रशासकीय कामकाजातील तत्परता, स्वच्छता, विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच लोकसहभागातून राबविण्यात आलेले विकासात्मक उपक्रम या यशासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत. सरपंच सौ. चंद्रभागा जाधव, उपसरपंच श्री. चंद्रकांत नागले, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व कर्मचारी यांनी समन्वयाने केलेले काम या यशामागे महत्त्वाचे ठरले आहे. तसेच गावातील विविध संस्था, महिला बचत गट आणि मुंबई व पुणे येथे वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांनी दिलेले सहकार्यही या यशात मोलाचे ठरले.
तोंडली ग्रामपंचायतीने मिळविलेला हा द्वितीय क्रमांक म्हणजे गावाच्या एकजुटीचा, विकासाभिमुख दृष्टिकोनाचा आणि सामूहिक प्रयत्नांचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या यशाबद्दल शिवसेना मंडणगड तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख श्री. प्रताप बिनायक घोसाळकर यांनी तोंडली ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. भविष्यातही तोंडली गावाने विकासाची हीच घोडदौड कायम ठेवावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.