खेड : – चवदार तळे सत्याग्रह शताब्दी समर्पित येथील पहिल्या कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा.डॉ. आशालता कांबळे यांची निवड विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी व संमेलनाचे स्वागताध्यक्ष ॲड तु.ल.डफळे व मुख्य संयोजक अनिल येसोंडे यांनी घोषित केली. यावेळी राज्य उपाध्यक्ष ॲड.सुदीप कांबळे, राज्य संघटक किशोर ढमाले उपस्थित होते .
समतावादी मूल्य संस्कृतीच्या प्रसारासाठी १९९९ सालापासून महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आजवर मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, सोलापूर, नंदुरबार, वाशी, पुणे, मनमाड, धुळे, परभणी, बुलढाणा, हिंगोली, निपाणी, पुणे, नाशिक, उदगीर, वर्धा, अमळनेर, संभाजीनगर, नांदेड, याठिकाणी एकंदर २२ विद्रोही मराठी साहित्य संमेलने(१ आंतरराज्य ,१महिला यांसह) आयोजित करण्यात आली आहेत. बाबुराव बागुल, वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ अजिज नदाफ, आत्माराम कनीराम राठोड, कॉ.तारा रेड्डी, तुलसी परब, डॉ. आ.ह. साळुंखे, संजय पवार, जयंत पवार, उर्मिला पवार, डॉ श्रीराम गुंदेकर, विमल मोरे, डॉ प्रल्हाद लुलेकर,डॉ प्रतिभा अहिरे, डॉ. आनंद पाटील, गणेश विसपुते, चंद्रकांत वानखेडे, डॉ. वासुदेव मुलाटे, डॉ. अशोक राणा, डॉ. बी. जी. वाघ, लोकनाथ यशवंत, यांसारख्या सर्जनशील साहित्यिकांनी या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे भूषवली आहेत.
अखिल भारतीय स्तरावरील संमेलनांबरोबरच विभागीय संमेलने आयोजित करण्याचा निर्णय विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने घेण्यात आला.त्यानुसार १४ फेब्रुवारी रोजी पहिले उत्तर महाराष्ट्र विद्रोही मराठी साहित्य संमेलन पार पडले. या पार्श्वभूमीवर खेड येथे कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा निर्णय घेण्यात आला. या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेल्या प्रा. डॉ. आशालता कांबळे या मूळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कांदळगावच्या असून मराठीतील फुले आंबेडकरी प्रेरणेने संविधान मूल्यांचे साहित्य लिहिणाऱ्या समीक्षक संशोधक व कवयित्री म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांनी आजपर्यंत बहिणाबाईची कविता एक आकलन,प्रवासी पक्षी मधील कुसुमाग्रज इत्यादी तीन समीक्षाग्रंथ, यशोधरेची लेक हा एक कवितासंग्रह, सावित्रीबाई फुले साहित्यमीमांसा, धम्मसंस्कृती ते संविधान संस्कृती, हिंदू कोड बिल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पत्रे व भाषणातून सावित्रीबाई फुले इत्यादी, आठ संशोधनपर वैचारिक ग्रंथ, लोकमाता अहिल्याबाई होळकर, रमाई:एक स्वतंत्र व्यक्तिमत्व, समर्थ स्त्रियांचा इतिहास, आमची आई इत्यादी , चार चरित्रात्मक ग्रंथ लिहिले आहेत. राजा ढाले समग्रलेखन, प्रदर्शनातून महामानव इत्यादी, चार संपादित ग्रंथ, वारसा, दृष्टी, आईची पत्रे इत्यादी , तीन ललित लेखसंग्रह अशा एकंदर तेवीस पुस्तके व ग्रंथांचे लेखन केले आहे. डॉ. आशालता कांबळे या फुले आंबेडकरी साहित्यिक,तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्या, परखड वक्त्या आणि निष्ठावान संशोधक व विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत.
यावेळी झालेल्या बैठकीत मेहबूब मोहीमतुले, संजय कासारे, रवीउदय जाधव, सचिन मोहिते, संजय काशीद, शाहीर विठोबा साळवी, बाबाराम पवार, वैशाली गोरे, स्वाती जाधव, शशिकांत शिंदे, नवनाथ काते, कृष्णा पाटील, ॲड.जावेद अली शिरलकर, मोहन चव्हाण, राजेंद्र निकम, भाऊसाहेब कांबळे, पूनम सालेकर हे कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. अशी माहिती मुख्य संयोजक व कोकण बुद्ध धम्म एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल येसोंडे यांनी दिली.
खेड येथील पहिल्या कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ. आशालता कांबळे
