चिपळूण : तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेअंतर्गत गोविंदरावजी निकम कृष महाविद्यालयातील कृषी कार्यानुभव कार्यक्रमाच्या माध्यमातून निवळी (ता. चिपळूण) येथे शेतकऱ्यांसाठी ‘झेंडू लागवड’ या विषयावर प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.
शेतकऱ्यांना झेंडू पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती, योग्य व्यवस्थापन व उत्पादनवाढीच्या तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना झेंडू लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड, सुधारित वाण, रोपांची लागवड, योग्य अंतर, खत व्यवस्थापन, सिंचन पद्धती तसेच तण व रोग-किड नियंत्रणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. वेळेवर खतांचा व पाण्याचा पुरवठा केल्यास तसेच शिफारशीनुसार पीक व्यवस्थापन केल्यास दर्जेदार फुलांचे अधिक उत्पादन मिळते, असेही सांगण्यात आले.
प्रात्यक्षिकादरम्यान झेंडूच्या रोपांची प्रत्यक्ष लागवड करून दाखविण्यात आली. यामध्ये लागवडीची योग्य पद्धत, रोपांची हाताळणी, लागवडीनंतरची काळजी, पाणी व्यवस्थापन तसेच फुलांची योग्य वेळी काढणी करून बाजारपेठेत विक्री केल्यास अधिक आर्थिक लाभ कसा मिळू शकतो, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
हा उपक्रम प्राचार्य डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, उद्यानविद्या विभागाचे प्रमुख प्रा. रोशन मोहिरे तसेच कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.