शिरगाव : चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास सोनपत्राच्या वरील बाजूस एका मोठ्या वळणावर टँकर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.मात्र शिरगाव पोलिसांनी तासाभरात टँकर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास घाटातून प्रवास करणारा टँकर मोठ्या वळणावर अचानक पलटी झाला. अपघातानंतर टँकर रस्त्यावर आडवा झाल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे चिपळूण तसेच कराडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जात असून त्यानंतर वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कुंभार्ली घाट हा वळणावळणाचा आणि धोकादायक मार्ग असल्याने वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, टँकर हटवल्यानंतरच घाटातील वाहतूक सुरळीत होणार आहे.