कादवड : देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कादवड नंबर २ मध्ये ‘एक राखी देशासाठी, एक राखी सैनिकांसाठी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. रक्षाबंधनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने सुंदर राख्या तयार करून त्या देशाच्या जवानांसाठी पाठवल्या आहेत.या अनोख्या उपक्रमासाठी शाळेत विशेष ‘राखी तयार करणे कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. मुख्याध्यापक श्री. देवराव शिसोदे आणि श्री. माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा अत्यंत उत्साहात पार पडली. यावेळी इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी विविध रंगीबेरंगी आणि पर्यावरणपूरक साहित्य वापरून आकर्षक राख्या तयार केल्या. आपल्या लाडक्या सैनिकांसाठी राखी बनवताना मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि देशप्रेमाचा अभिमान ओसंडून वाहत होता.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, सखी सावित्री समिती तसेच माजी विद्यार्थी समितीच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेने राबवलेल्या या स्तुत्य आणि राष्ट्रभक्तीने प्रेरित असलेल्या उपक्रमाचे सर्वत्र जोरदार स्वागत होत असून, सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षक वृंदाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.