पेठमाप-गोवळकोट : येथील सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात सदैव सक्रिय असलेले स्व. दिपक दत्तात्रय निंबरे यांचे गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पेठमाप-गोवळकोट परिसराने एक सच्चा समाजसेवक, धार्मिक वृत्तीचा व मनमिळावू व्यक्ती गमावली असून वाडीचा एक आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

स्व. दिपक निंबरे हे श्री गणेश मित्र मंडळ, पेठमाप गणेशवाडीचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान संचालक मंडळाचे सल्लागार होते. वाडीतील कोणताही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम असो, ते नेहमीच उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत असत. तरुण कार्यकर्त्यांमध्ये मिळून-मिसळून काम करताना त्यांनी अनेकांना प्रोत्साहन दिले.

पेठमाप-गोवळकोट श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या सेवेतही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. देवस्थानच्या कार्यासाठी त्यांनी दिलेली सेवा आणि वाडीच्या विकासासाठी घेतलेला पुढाकार कायम स्मरणात राहील. चिपळूण येथील नातू हॉस्पिटलशीही त्यांचा सेवाभावी संबंध होता. तसेच त्यांचा स्वतःचा गणपती कारखाना होता.

सर्वांशी आपुलकीने वागणारे, मनमिळावू आणि मदतीस सदैव तत्पर असलेले दिपक निंबरे यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी व वाडीतील नागरिकांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याची आणि प्रेमळ स्वभावाची आठवण कायम राहील.