सावर्डे : महाराष्ट्र शासनाच्या विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या शेतकऱ्यांचा गौरव सोहळा सावर्डे येथील आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती सौ. पूजा शेखर निकम यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. शेखर निकम यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सन 2023)’ प्राप्त श्री. अनंत बाबाजी खांबे (मांडकी), महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या राज्यस्तरीय नाचणी पीक स्पर्धेतील जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त श्री. धाकटू रत्ना गावकर (ढोकरवली) तसेच राज्यस्तरीय नाचणी पीक स्पर्धेतील तालुकास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त श्री. आत्माराम गोपाळ पुनवत (दहिवली खुर्द) यांचा सन्मान करण्यात आला. प्रगतिशील शेतकरी श्री. अनंत बाबाजी खांबे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून ती विज्ञान, नियोजन आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांचा संगम आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून दर्जेदार उत्पादन वाढविल्यास शेती अधिक समृद्ध होऊ शकते. प्रत्येक शेतकऱ्याने नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी.”
यावेळी आमदार श्री. शेखर निकम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “राज्यातील प्रगतिशील शेतकरी हे कृषी क्षेत्राचे खरे प्रेरणास्थान आहेत. आधुनिक शेती, जलसंवर्धन, पीक विविधीकरण आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेती अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांच्या कार्यातून इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळेल आणि शेती अधिक समृद्ध होईल.”
त्यावेळी सौ. पूजा शेखर निकम यांनी आपले मत व्यक्त केले की “शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मेहनती व प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करणे म्हणजे शेतीचा सन्मान होय. नव्या पिढीने शेतीकडे आधुनिक व्यवसाय म्हणून पाहावे, नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनातून शेती अधिक सक्षम करण्यासाठी पुढे यावे.”