चिपळूण : सोमवारी रात्री कुंभार्ली घाटातून प्रवास करणाऱ्या रोहा-कोल्हापूर एसटी बसमधील प्रवाशांना बिबट्याचे दर्शन झाले. घाट परिसरातील रस्त्यालगतच्या कठड्यावर बिबट्या बसलेला दिसून आला. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी हा थरारक क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.

रात्रीच्या अंधारात अचानक रस्त्याच्या कडेला बिबट्या दिसल्याने बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ उत्सुकतेसोबतच भीतीचे वातावरण निर्माण झाले. बिबट्या काही वेळ कठड्यावर बसलेला असल्याचे या छायाचित्रातून दिसून येत आहे.

कुंभार्ली घाट परिसरात वन्यप्राण्यांचा वावर यापूर्वीही अनेकदा आढळून आला आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी आणि प्रवाशांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. बिबट्याचे दर्शन झाल्याने घाट परिसरातील वन्यजीवांच्या हालचालींकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे कुंभार्ली घाटातून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्येही सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे.