चिपळूण : वहाळ जिल्हा परिषद गटातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी तसेच नागरिकांच्या विविध अडचणी व स्थानिक स्तरावरील प्रलंबित बाबींवर प्रभावी चर्चा करण्यासाठी लवकरच प्रभाग समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पंचायत समिती प्रशासन आणि संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याने नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होणार आहे.
या पार्श्वभूमीवर गटातील सर्व नागरिकांनी आपल्या गावातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधा तसेच इतर विकासकामांशी संबंधित समस्या व अडचणी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांच्या नावे तातडीने सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रभाग समिती ही शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानली जाते. या बैठकीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहत असल्याने नागरिकांच्या अडचणींवर थेट चर्चा करून त्याबाबत आवश्यक कार्यवाहीची दिशा निश्चित केली जाते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या भागातील कोणतीही समस्या प्रलंबित न ठेवता ती वेळेत निवेदनाद्वारे मांडणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
वहाळ जिल्हा परिषद गटात लवकरच प्रभाग समितीची बैठक; नागरिकांनी निवेदनाद्वारे समस्या तातडीने मांडाव्यात – जि.प. सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांचे आवाहन
