मुंबई : देशातील वातावण बदलले आहे, जनता आता भाजपा मोदी शाह सरकारला प्रश्न विचारत आहे आणि सरकार पूर्णपणे घाबरले आहे. भाजपा सरकारकडे सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम वाद उकरून काढण्याचे षडयंत्र रचले आहे. वंदे मातरम वरून भाजपाने सुरु केलेल्या षडयंत्राला बळी पडू नका. देशातील हवा बदलली असली तरी बदला घेण्याची संस्कृती काँग्रेसची नाही तर ‘मोहब्बत की दुकान’ हाच आपला मार्ग आहे, तो सोडू नका, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष आ. साजीद खान पठाण यांचा पदग्रहण सोहळा टिळक भवन येथे संपन्न झाला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगडी, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. अस्लम शेख, अमिन पटेल, आ. शिरीष नाईक, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार एम. एम शेख, वजाहत मिर्झा यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, वंदे मातरम या गिताला राष्ट्रगिताचा दर्जा हा काँग्रेसने दिला, महात्मा गांधी, पंडित जहारलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाचंद्र बोस यांच्या प्रमुख नेतृत्वात वंदे मातरमची किती कडवी गायची हा निर्णय घेतला गेला. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात ते गायिले जाते, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भागही घेतला नाही त्या भाजपाने काँग्रेस पक्षाला राष्ट्रभक्ती शिकवण्याची गरज नाही. समाजात वाद निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजणे हा भाजपाचा डाव असून त्यासाठीच वंदे मातरम चा वाद उकरून काढला आहे पण त्यांचा हा कुटील डाव कदापी यशस्वी होणार नाही, असेही सपकाळ म्हणाले..

अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगडी यावेळी म्हणाले की, मागील १२ वर्षापासून देश मोठ्या संकटातून जात आहे. पण आता हवा बदलली आहे, दिल्लीत जंतर मंतरवरून विद्यार्थ्यांनी सरकारला जाब विचारला, या विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करण्यात आले, पाटण्यात एके ४७ चालवण्यात आली, गोळ्या घातल्या पण ते मागे हटले नाहीत शेवटी सरकारला मागे हटावे लागले. विद्यार्थ्यांनी संसदेकडे कूच केली त्यावेळी भाजपाचे मंत्री संसदेतून पळाले. जेन-झी च्या रेट्यामुळे पंतप्रधानांची झोप उडाली असल्याने रात्री अपरात्री ते व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर अपलोड करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी राहुल गांधी हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. ‘छात्रों की गुंज’ अभियान हाती घेऊन ते देश ढवळून काढत आहेत. ‘कोटा’पासून सुरु झालेला हा एल्गार अडवण्याचा भाजपा सरकारने प्रत्येकवेळी प्रयत्न केला. आता २२ तारखेला पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमातही अडथळा आणण्यासाठी जमाव बंदीचा आदेश जारी केला आहे. परंतु भाजपा सरकारने राहुल गांधी यांना अडवण्याचा प्रयत्न करू नये, कोणतीही शक्ती राहुल गांधी यांना अडवू शकत नाही. पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी करून दाखवा, असेही इम्रान प्रतापगडी यांनी म्हटले आहे.