मुंबई : ३० सप्टेंबर रोजी MPSC विद्यार्थी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत संवेदनशीलतेने ऐकून घेतल्या. व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा दृढ करण्यासाठी संविधान आणि कायद्याच्या चौकटीत जेवढे जास्तीत जास्त निर्णय घेणे शक्य आहे, ते घेण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता.

“आणि कालच्या काल मुख्यमंत्री साहेबांनी आपला शब्द पाळला,” असे आ. विक्रम पाचपुते यांनी म्हटले आहे.

१ ऑक्टोबर रोजी शासनाने आदेश काढून श्री. महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदी दोन वर्षांसाठी प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली.

याबाबत आ. विक्रम पाचपुते म्हणाले, “ही संवेदनशील मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती आहे—विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकायचे, शक्य तेवढे सकारात्मक निर्णय घ्यायचे आणि दिलेल्या शब्दाची तातडीने पूर्तता करायची. MPSC व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री साहेब जास्तीत जास्त निर्णय घेत आहेत.”

ते पुढे म्हणाले, “परंतु कोणतीही अट किंवा घटनात्मक मर्यादा न मानता केलेली मागणी पूर्ण करणे शक्य नाही. MPSC ही घटनात्मक संस्था असल्याने प्रत्येक निर्णय संविधान आणि कायदेशीर प्रक्रियेच्या चौकटीतच व्हायला हवा. विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांना न्याय मिळावा आणि त्याचवेळी संस्थेची स्वायत्तता अबाधित राहावी, ही आपली स्पष्ट भूमिका आहे.”