म्हसळा ( महेश पवार ) : म्हसळा नगरपंचायतीच्या राजकारणात अखेर अपेक्षेप्रमाणे मोठे सत्तांतर घडले असून नगराध्यक्ष निवडणुकीत शिंदे शिवसेनेने बाजी मारत नगरपंचायतीवर पुन्हा भगवा फडकविला आहे.काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेनेचे शाहिद जंजिरकर यांची नगराध्यक्षपदी निवड झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत शाहिद जंजिरकर यांना ९ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेडगे यांना ६ मतांवर समाधान मानावे लागले.विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक नगरसेवक शिवसेनेच्या गोटात गेल्याने तो मतदान प्रक्रियेदरम्यान अनुपस्थित राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.१७ सदस्यसंख्या असलेल्या म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ सदस्य होते. मात्र त्यापैकी ८ नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे गटातील एका नगरसेवकाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असला तरी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी शिंदे शिवसेनेच्या बाजूने मतदान केल्याने ९ विरुद्ध ६ अशी स्पष्ट मतांची विभागणी झाली.शिंदे सेनेत गेलेल्या माजी नगराध्यक्षा या आधीच अपात्र ठरल्याने त्यांना या निवडणुकीत सहभागी होता आले नाही.गेल्या नऊ वर्षांपासून म्हसळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र मंत्री भरत गोगावले यांच्या रणनीतीमुळे या सत्तेला सुरुंग लागल्याची चर्चा राजकीय स्तरावर सुरू आहे.या घडामोडींमुळे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांना त्यांच्या मतदारसंघात मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.