मुंबई : संजय राऊत हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ मालिकेचा पुढचा भाग सादर करून सत्तेत येण्याचे स्वप्न पुन्हा बघत आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना भाजपा आमदार फोडण्याचा प्रयत्न केला. भाजपा आमदारांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न केले. पण भाजपाचा साधा नगरसेवक, कार्यकर्ताही फोडता आला नाही. उबाठा गटाचा बचत गट झाला आहे, त्याकडे लक्ष द्या. नाहीतर येत्या काळात हा बचत गटही उरणार नाही. टमटममध्ये बसलेल्या चार प्रवाशांसारखी उबाठा गटाची अवस्था होईल, अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी संजय राऊतांची खिल्ली उडवली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘आमचा पक्ष फोडल्याने आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शाह यांना भेटायला जाणार नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत’, असे संजय राऊत सांगताहेत. याचा अर्थ शरद पवार स्वाभिमानी नाहीत का? सुप्रियाताई सुळे स्वाभिमानी नाहीत का? याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना भेटायला जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या आठ खासदारांवर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करता? संजय राऊतांनी आपला स्वाभिमान काँग्रेसच्या चरणावर अर्पण केला आहे. राऊत हे राहुल गांधींची गुलामगिरी करतात. त्यांच्या हातातील खंजिराला गद्दारीचे रक्त लागलेले असल्याने संजय राऊत, उद्धव ठाकरे हे धनुष्यबाण पेलू शकत नव्हते. त्यामुळे खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचींच असल्याचा कौल जनतेने दिला, असे श्री. बन म्हणाले.
संजय राऊत, विनाकारण बढाया मारू नका. महाराष्ट्रातल्या जनतेने षंढ, नामर्द आणि अपयशी असे तिन्ही शिक्के तुमच्यावर लावलेले आहेत. आता संजय राऊत एवढेच मर्द असतील, तर माझे त्यांना आव्हान आहे की येत्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संजय राऊत यांनी अलिबागच्या कुठल्याही गावातून उभे राहावे. भाजपाचा साधा कार्यकर्ताही संजय राऊतांना पराभूत करेल. संजय राऊतांना मर्दानगीची टेस्ट देण्याची खुमखुमी असेल तर ग्रामपंचायत निवडणूक, गेलाबाजार महापालिका निवडणूक, विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी. कोण मर्द आहे, कोण नामर्द आहे, हे जनतेच्या न्यायालयात सिद्ध होईल, अशा शब्दात श्री. बन यांनी कोरडे ओढले.
संजय राऊत यांनी दावा केला होता की, २५ वर्षे महाविकास आघाडीचे सरकार राहील. त्यांचा हा दावा खोटा ठरला. संजय राऊत यांनी हाही दावा केला होता की, ‘आता आमचा एकही खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार नाही.’ एक नाही तर तुमचे सहा खासदार नाकाखालून निघून गेले. तुम्हाला थांगपत्ता लागला नाही. आता पवारसाहेबांबद्दल तुम्ही भाकीत करता. आगे आगे देखो, होता है क्या, असे श्री. बन यांनी सुनावले.
टमटममध्ये बसलेल्या चार प्रवाशांसारखी उबाठाची अवस्था होईल; भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली…
