चिपळूण : चिपळूणच्या सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरेला साजेशा वातावरणात श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण यांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कै. कमळाकरशेठ चितळे व्याख्यानमालेत विचारांचा जणू ज्वालामुखीच उसळला. मंडळाच्या अमृत महोत्सवी ७५ व्या वर्षानिमित्त आयोजित या विशेष व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील अभ्यासू, परखड आणि लोकप्रिय वक्ते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी “राष्ट्रपुरुषांचे आदर्श – नव्या पिढीची जबाबदारी” या विषयावर केलेल्या धारदार भाषणाने उपस्थितांच्या मनावर अक्षरशः ठसा उमटवला.

मार्कंडी येथील नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रंगमंच, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमाला चिपळूणकर नागरिक, युवक, अभ्यासक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा जपणाऱ्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९५२ साली झाली असून गेली अनेक दशके मंडळाने समाजप्रबोधनाची परंपरा अखंड ठेवली आहे. यंदाच्या अमृत महोत्सवी वर्षात झालेल्या या व्याख्यानाने त्या परंपरेत आणखी एक भक्कम अध्याय जोडला. उत्सवांच्या माध्यमातून समाजप्रबोधन, वैचारिक जागृती आणि राष्ट्रभान जपण्याची परंपरा श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पुन्हा एकदा प्रभावीपणे सिद्ध केली. सण, उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम केवळ दिखावा किंवा मनोरंजनापुरते मर्यादित न ठेवता समाजाला दिशा देण्याचे कामही करू शकतात, याचा प्रत्यय या व्याख्यानमालेतून आला.

नित्यानंद भागवत यांच्या सूत्रसंचालनानंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली .