चिपळूण : खरीप हंगामाच्या तोंडावरच चिपळूण तालुक्यात निर्माण झालेल्या तीव्र खतटंचाईमुळे शेतकरी अक्षरशः संकटाच्या खाईत लोटले गेले आहेत. उशिरा सुरू झालेल्या पावसाने आधीच चिंतेत असलेल्या शेतकरी बांधवांनी पाऊस सुरू होताच मोठ्या आशेने पेरणी आणि शेतीकामांना सुरुवात केली मात्र याच निर्णायक टप्प्यावर युरिया, डीएपी, एनपीके यांसारख्या अत्यावश्यक खतांचा तुटवडा आणि दुबार पेरणीसाठी आवश्यक बियाण्यांची अनुपलब्धता यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडण्याची वेळ आली आहे. या गंभीर प्रश्नावर शासन आणि प्रशासनाचे तातडीने लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि इंदिरा काँग्रेस या महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी आज चिपळूण येथील तहसीलदार कार्यालयावर एकत्र येत निवेदन सादर केले.

महाविकास आघाडीच्या वतीने यापूर्वी सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी प्रशासनाच्या दारात ठामपणे उभे राहिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण न करता त्यांच्या अडचणीला प्राधान्य देत महाविकास आघाडीने दाखविलेली ही एकजूट लक्षवेधी ठरली.

महाविकास आघाडीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये खतांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोज खत केंद्रांवर फेऱ्या माराव्या लागत आहेत. तासन्तास रांगेत उभे राहूनही हाती काहीच लागत नसल्याने शेतकरी हताश होत आहेत. पावसाचा हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीची धावपळ सुरू केली असताना खत विक्रीतील अडथळे आणि अपुरा पुरवठा ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले. काही ठिकाणी कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजाराला खतपाणी मिळत असल्याच्या तक्रारीही पुढे येत असल्याने प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे अत्यावश्यक असल्याचे महाविकास आघाडीने बजावले.