चिपळूण (ललेश कदम ) : तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेली निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे सूर्यकांत खेतले तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट)चे संदेश आयरे यांची बिनविरोध निवड झाली.
सभापतीपदासाठी सूर्यकांत खेतले यांचा तर उपसभापतीपदासाठी संदेश आयरे यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी सकाळी ११ वाजता दाखल करण्यात आला. या दोन्ही उमेदवारांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, विनोद झगडे, माजी सभापती धनश्री शिंदे, जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम, विनोद झगडे, यांच्यासह महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिपळूण पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू निकाल दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने स्वतंत्र निवडणूक लढवत ७ जागा जिंकल्या होत्या. तर भाजप-शिवसेना युतीत शिवसेनेला ४ आणि भाजपला ३ जागा मिळाल्या. दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ४ जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेबाबत गेल्या महिनाभरापासून मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
अखेरीस पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेत सत्ता स्थापन केली आणि सभापतीपद आपल्या पारड्यात पाडले.
सुरुवातीला आमदार शेखर निकम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत सत्ता स्थापनेच्या चर्चेत असल्याची चर्चा होती. मात्र जिल्ह्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन अखेर राष्ट्रवादीने महायुतीसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. या निर्णयामुळे सूर्यकांत खेतले यांची सभापतीपदी निवड निश्चित झाली.
दरम्यान, सभापतीपदाचा कार्यकाळ अडीच अडीच वर्ष असल्याची माहिती मिळत आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
