मुंबई : वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचे म्हणणाऱ्या शरद पवार यांनी या संप्रदायात घुसखोरी केलेल्या अर्बन नक्षलवाद्यांना कसे बाहेर काढायचे याबद्दलही आपली भूमिका स्पष्ट करत या घुसखोर अर्बन नक्षलवाद्यांची आकडेवारी त्यांनी एकदा महाराष्ट्रासमोर ठेवावी, अशी मागणी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना चिकित्सा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. वारकरी संप्रदाय हा प्रबोधन करणारा संप्रदाय आहे. संत ज्ञानोबा, तुकोबा, निळोबा यांनी हा संप्रदाय वाढवला. देव, देश आणि धर्मासाठी काम करणारा आणि भक्ती चळवळ वाढवणारा हा वारकरी संप्रदाय आहे. हिंदू धर्माची, भागवत धर्माची पताका उंचावणाऱ्या वारकरी संप्रदायात लोकांचे प्रबोधन करण्यास जास्त महत्त्व असते. वारकरी संप्रदायात धर्मांध शक्ती नाही तर औरंगजेब आणि अफजल खानाची वंशावळ ही धर्मांध शक्ती आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लव जिहाद, वोट जिहाद, लँड जिहाद करण्याचा प्रयत्न धर्मांध शक्तीच्या माध्यमातून केला जातो. दुर्दैवाने शरद पवारसाहेब ज्येष्ठ नेते असूनही त्याबद्दल बोलत नाहीत, अशी टीका श्री. बन यांनी केला.
विजय वडेट्टीवार यांना प्रत्येक ठिकाणी अल्पसंख्यांकाचे लांगुलचालन करणे एवढेच दिसते. कारण काँग्रेसची मदार ही काही विशिष्ट धर्माच्या मतांवर अवलंबून आहे. राहुल गांधी हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असल्याचे त्यांना वाटत असल्याने ते औरंगजेब आणि अफजल खानाच्या दाढ्या कुरवळण्याचे काम करतात. खरात कुठल्या धर्माचा आहे हे महत्त्वाचे नाही. खरातने केलेल्या कृत्याबद्दल शिक्षा करण्याची हिंमत काँग्रेसचे सरकार असते तरी विजय वडेट्टीवार यांचीही झाली नसती. भाजपा सरकार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणून ही कारवाई झाली, असे श्री. बन यांनी सुनावले.
भाजपा किंवा महायुतीचे सरकार असताना कुठेही महिला आणि पुरुष असा भेदभाव केला जात नाही. याआधी देवेंद्रजींच्या नेतृत्वातले सरकार आले तेव्हा वेगवेगळ्या प्रमुख पदांवर महिला अधिकारी कार्यरत होत्या. आताही मुंबई महापालिका, राज्य सरकारात सगळ्या ठिकाणी महिला अधिकाऱ्यांना सन्मानाचे आणि प्राधान्याचे स्थान देण्यात आले आहे. केंद्रामध्ये भाजपाने महिला नारी शक्ती वंदन अभियान सुरू केले. त्याद्वारे 2029 मध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केले जात असल्याने नारी शक्तीला वंदन करणे हेच आमचे धोरण असल्याचे श्री. बन यांनी सांगितले.
संपूर्ण महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता असावी, मुंबईकरांचे पहारेकरी आणि मुंबईकरांना उत्तरदायित्व म्हणून आम्ही महापालिकेत बसलेलो असल्याने नालेसफाईवर नजर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. शक्य आहे त्या ठिकाणी एआयचा वापर करून घोटाळे कमी करायचे हा भाजपा आणि महायुतीचा प्रयत्न असल्याचे श्री. बन यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी कधीतरी वारकरी संप्रदायातील घुसखोर अर्बन नक्षलवाद्यांबद्दलही बोलावं – नवनाथ बन यांचा प्रहार
