रायगड : गेल्या पावणेदोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अखेर मंत्री भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर भरत गोगावले यांनी किल्ले रायगडावर जाऊन राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करत त्यांनी रायगडच्या विकासासाठी नव्या जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

रायगडच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासोबतच पायाभूत सुविधा, उद्योग, रोजगार, पर्यटन आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर विशेष लक्ष देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, रायगडमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. तब्बल ५ हजार ४८० कोटी रुपयांचे MOU झाले असून, त्यातून सुमारे ४ हजार रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

रायगडच्या विकासासाठी महायुतीतील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचंही पालकमंत्री भरत गोगावले यांनी सांगितलं. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन विकासाचा रोडमॅप तयार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेनेच्या राजकीय स्थितीवरही भरत गोगावले यांनी भाष्य केलं. धनुष्यबाण हे पक्षाचं अधिकृत चिन्ह आणि शिवसेनेचं नाव एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन रायगडचा विकास करण्याचा निर्धार पालकमंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे.