सिंधुदुर्ग : कुडाळ शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार नीलेश राणे यांच्याकडून तब्बल ३ कोटी ३० लाख रुपयांचा आमदार निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, निधीच्या घोषणेसोबतच आयोजित पत्रकार परिषदेत शहरातील वाढत्या अतिक्रमणावरून आणि वाहतूक कोंडीवरून पत्रकारांनी प्रशासकीय प्रतिनिधींना चांगलेच धारेवर धरले.

कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार नीलेश राणे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून ३ कोटी ३० लाखांचा भरीव निधी उपलब्ध केला आहे. या निधीतून प्रत्येक वॉर्डातील विकासकामांना गती दिली जाणार आहे.

या निधीतून नाबरवाडी आणि कवीलकट्टा येथील पाणी समस्येसाठी विहिरी, भटक्या गुरांच्या बंदोबस्तासाठी गोशाळेकरिता १५ लाखांची तरतूद, मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण, कुडाळेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण आणि नाना-नानी पार्कची कामे केली जाणार आहेत. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळातूनही अतिरिक्त निधी मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
एकीकडे विकासकामांची घोषणा होत असतानाच, दुसरीकडे शहरातील एसटी बस थांबा, पोस्ट ऑफिस परिसर आणि सणासुदीच्या तात्पुरत्या स्टॉल्समुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मुद्दा पत्रकारांनी आक्रमकपणे मांडला.संबंधित रस्ते हे MIDC आणि PWD च्या अखत्यारीत येत असून पत्रव्यवहार करूनही कारवाई होत नसल्याची खंत नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांनी व्यक्त केली. तर स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांची गैरसोय न करता जागेचे सुयोग्य नियोजन करून वाहतूक कोंडी सोडवली जाईल, अशी ग्वाही नगरसेवक अभी गावडे यांनी दिली.